‘त्या’ प्रकरणात राहुल गांधींनी न्यायालयात हजर राहण्याचे कायदेशीर कारण नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी पुणे न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यात काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी केला होता. या अर्जाला राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी विरोध केला.
या अर्जात राहुल गांधींनी न्यायालयात का हजर रहावे याचे कोणतेही कायदेशीर कारण दिलेला नाही. भाजप आणि फिर्यादी सारख्या हस्तकांकडून देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात खोटे खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे, असा युक्तिवाद केला.
राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश द्यावा अशी मागणी करणारा अर्ज सात्यकी सावरकर यांनी दाखल केला होता.
या प्रकरणी आज झालेल्या सुनावणी राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी युक्तिवाद करणारा या अर्जाला विरोध केला. सध्या देशभरात भाजप आणि फिर्यादी सारख्या हस्तकांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे या गांधी हत्येतील आरोपींचा उल्लेख अर्जात करून त्यांचे अप्रत्यक्ष कौतुक फिर्यादींनी केले आहे. या भूमिकेतून फिर्यादी हे गांधी हत्येचे समर्थनच करताना दिसतात, ही बाब खेदजनक आहे.
फिर्यादींनी प्रथम आपला अर्ज कोणत्या कायद्याअंतर्गत दाखल केला आहे हे स्पष्ट करावे. त्यानंतरच राहुल गांधींच्या वतीने या अर्जाला तपशीलवार उत्तर दिले जाईल. कायद्याचा आधार नसलेल्या व लोकशाही विरोधी विचारसरणीला पोषक अशा अर्जाला मान्यता देऊ नये, असा युक्तिवाद ॲड. पवार यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.





