मुंबई-विदर्भातील जागांवर पाणी सोडावं लागल्याने राहुल गांधी नाराज ?

Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील (MVA) जागावाटपावर अखेर एकमत झाले असले, तरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट प्रत्येकी ८५ जागांवर निवडणूक लढवण्यास सहमत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष १०० हुन अधिक जागांवर निवडणूक लढण्यावर ऑन बसला होता. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील जागावाटपाच्या मुद्द्यावर मागे हटायला तयारी नव्हती. यावरून महाविकास आघाडीवर बिघाडाचे मळभ दाटून आले होते.
मात्र या जागावाटपावर अखेर एकमत झालं असे असले तरी विदर्भ आणि मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिल्यामुळे राहुल गांधी नाराज आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत राहुल गांधींनी बैठकीत मत व्यक्त केले. त्यानंतर राहुल गांधी हे बैठक मध्यातच सोडून बाहेर गेले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यानंतरही सुमारे तासभर CEC मीटिंग सुरू होती.
रिपोर्टनुसार, महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी अनेक जागांवर उमेदवार म्हणून तिकीट मिळावे यासाठी आपले नातलग किंवा जवळच्या लोकांची नावं पुढे केली आहेत. अनेक नेते तर असेही आहेत ज्यांनी कुटुंबातील सदस्यांसाठीच तिकीट मागितलं. मात्र त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
लवकरच आम्ही उमेदवारांच्या नावांची दुसरी आणि तिसरी लिस्ट जाहीर करू. महाराष्ट्र आमची उत्तम कामगिरी लवकरच दिसेल. राज्यात बहुमताने महाविकास आघाडीचंच सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठठ नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. आम्ही काही जागांची मागणी करत आहोत. आम्हाला ज्या जागा (आत्तापर्यंत) मिळाल्या आहेत, तेथे आम्ही ओबीसींना ( उमेदवार) न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
Maharashtra Assembly Election 2024 । ‘समान जागावाटप’ फॉर्म्युला
महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. काँग्रेसच्या हातातील बाहुलं बनल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असताना, आघाडीत मोठा भाऊ कोण हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. यावरूनच ठाकरे व काँग्रेसमध्ये खटके उडत होते. आघाडी तुटते की काय, अशा चर्चा सुरु झाल्यानंतर शरद पवार यांनी आपलं राजकीय चातुर्य दाखवत काँग्रेस पक्षश्रेष्टींशी चर्चा केली.
यावेळी, हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा दाखल देत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळेच, महाविकास आघाडीने ‘समान जागावाटप’चा फॉर्म्युला स्वीकारत प्रत्येकी ८५ जागांवर लढण्याचे ठरवले तसेच उर्वरित जागा मित्र पक्षांनी देऊन त्यांचीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
Maharashtra Assembly Election 2024 । मुख्यमंत्रीपदावर पवारांच्या राष्ट्रवादीची दावेदारी मजबूत?
महाविकास आघाडीच्या या नव्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची मांडणी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या जागावाटपात, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी पारंपरिक वर्चस्व नसलेल्या जागा सोडल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात शरद पवारांना अधिक जागा मिळाल्या आहेत. पवारांची ही रणनीती केवळ जागावाटपापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या सत्ताकारणात प्रभाव वाढवण्याची असल्याचं बोललं जातंय. विधानसभेत महाविकास आघाडीने विजय मिळवला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदावर दावेदारी मजबूत होईल, असंही राजकीय जाणकारांचं मत आहे.
शरद पवार हे नाव अनेक राजकीय चर्चांनी वेढलेलं असतं, कधी या चर्चा खऱ्या ठरतात तर कधी हवेत विरतात. महाविकास आघाडीच्या समान जागावाटपामागे शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदासाठीची खेळी असल्याचं बोललं जात असलं तरी यामध्ये किती तथ्य आहे, हे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच समजेल.





