Rahul Gandhi in Hathras : ‘त्या’ पीडित कुटुंबाचे पत्र येताच राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण….

Rahul Gandhi in Hathras : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. राहुल गांधी आज हाथरसच्या बूल गढी गावात पोहोचले. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील गावात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.
14 सप्टेंबर 2020 रोजी हाथरस गावात एका 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबाने राहुल गांधींना पत्र लिहून न्यायाची याचना केली. त्यानंतर राहुल गांधी आज पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राहुल गांधींच्या हाथरस दौऱ्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले की,’राहुल गांधी निराशेचे बळी ठरले आहेत. उत्तर प्रदेशबाबत राहुल गांधी सतत उलटसुलट विधाने करत आहेत. राहुल गांधींना उत्तर प्रदेशला अराजकता आणि दंगलीत ढकलायचे आहे’. असं ते म्हणाले.
ब्रजेश पाठक यांचा राहुल गांधींवर निशाणा :
ब्रजेश पाठक म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशात औद्योगिक क्रांती होत आहे. राहुल गांधींना हातरसबद्दल काहीच माहिती नाही. सीबीआयने हाथरसमध्ये तपास केला आहे, कायद्यानुसार न्यायालयात खटला सुरू आहे. कधी राहुल गांधींना संभलला जायचं असतं, तर कधी अलिगढला जायचं असतं. राहुल गांधी पूर्णपणे रुळावरून घसरले आहेत. तुम्हाला राज्यातील जनतेला भडकवायचे आहे. मी तुम्हाला हे करू नये अशी विनंती करतो. आज राज्य देशातील नंबर 1 राज्य होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
2020 ची हाथरस घटना काय आहे?
2020 च्या हाथरस घटनेने संपूर्ण देश हादरला. आणि महिला सुरक्षा आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर गंभीर वादविवाद सुरू झाले. 14 सप्टेंबर 2020 रोजी हाथरस गावात एका 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. मुलीला गंभीर अवस्थेत अलीगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून पीडितेला चांगल्या उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. 29 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे बरेच राजकारण झाले आणि विरोधी पक्षांनी सरकारवर महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.
पोलिसांनी मध्यरात्री अंत्यसंस्कार केले :
वाद एवढ्यावरच संपत नाही तर मध्यरात्री पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याने देशभरातील संताप आणखी वाढला. पोलिसांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध हे पाऊल उचलल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. मध्यरात्री झालेल्या अंत्यसंस्काराची चित्रे आजही लोकांच्या मनात ताजी आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. या घटनेत जातीभेदाचीही भूमिका होती. देशभरातील लोकांचा रोष पाहून सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.





