Rahul Gandhi : “ज्ञानेश कुमार देशद्रोही, तातडीने राजीनामा द्यावा” – राहुल गांधी
ज्ञानेश कुमार यांच्यावर गुरूवारी आणखी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. कुमार यांचा उल्लेख त्यांनी देशद्रोही म्हणून केला. तसेच, त्यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी केली.

Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गुरूवारी आणखी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. कुमार यांचा उल्लेख त्यांनी देशद्रोही म्हणून केला. तसेच, त्यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी केली.
एका वृत्तपत्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मतदारयाद्या पडताळणीशी (एसआयआर) संबंधित काही मुद्द्यांवर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याचे त्या बातमीने समोर आणले. त्यामुळे कुमार वादंगाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर, राहुल यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही घेरले. मत हा आपल्या लोकशाहीचा आधार आहे. मात्र, आपले मत संपुष्टात आणले जात आहे. कुमार यांची कृती देशविरोधी आहे. देशाच्या राज्यघटनेवर आणि कायदेशीर रचनेवर हल्ला झाला आहे.
मात्र, आम्ही लोकशाही उद्धवस्त होऊ देणार नाही. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशविरोधी कृतीसाठी जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मोदी आणि शहांनाही चौकशीला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. कुमार यांनी सरकारी साक्षीदार बनावे, असा सल्लाही राहुल यांनी दिला.
मोदी आणि शहा यांच्या भाषणांच्या काही व्हिडीओंचेही सादरीकरण राहुल यांनी केले. त्यामध्ये मोदी अबकी बार, ४०० पार अशी घोषणा देताना दिसतात. तर, भाजप ३० वर्षे सत्तेत राहील, असा दावा शहा करताना आढळतात. त्या व्हिडीओंचा संदर्भ देऊन राहुल म्हणाले, लोकशाही वातावरणात कार्य करणारा कुठलाच नेता अशाप्रकारची वक्तव्ये करू शकत नाही.
त्यातून त्यांनी व्हिडीओंमधील वक्तव्यांवर एकप्रकारे आक्षेप नोंदवले. भारतात सातत्याने सत्ताधारीविरोधी स्थिती दिसून येते. मात्र, मोदी, शहा आणि भाजपबाबत ती स्थिती उद्भवत नसल्याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनियमितता घडल्याची शंभर टक्के खात्री वाटत असल्याचा दावाही केला.





