जयपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील त्या पक्षाची महत्वाकांक्षी भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) उद्या (शुक्रवार) शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण करणार आहे. यात्रेच्या माध्यमातून सुरू केलेल्या पायी प्रवासामुळे राहुल नवा राजकीय ब्रॅंड म्हणून उदयास येत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्यांचा प्रवास कॉंग्रेससाठी गेम-चेंजर ठरणार का ते आगामी निवडणुकांच्या निकालांवरूनच समजू शकेल.
गुजरात सरकारच्या तीव्र विरोधानंतरही गोध्रा हत्याकांडातील दोषीला SC ने मंजूर केला जामीन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे देशभरातील विविध निवडणुकांत भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली. त्याउलट, कॉंग्रेसच्या पीछेहाटीचे सत्र सुरू झाले. त्यातून अनेकांनी हात सोडल्याने पक्षाला जणू गळतीच लागली. त्यामुळे कॉंग्रेसच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. त्या प्रतिकूल स्थितीत कॉंग्रेसने पुनरूज्जीवनासाठी पाऊले उचलण्याचा निर्धार केला. तो तडीस नेण्याच्या दृष्टीने पक्षाने सुरू केलेल्या वाटचालीसाठी यात्रा हा योग्य प्रारंभ म्हणता येईल.
निवडणुकांत कॉंग्रेसला यात्रेमुळे लाभ होणार का, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. अशात गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. ते कॉंग्रेससाठी संमिश्र ठरले. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या आजवरच्या नीचांकी कामगिरीची नोंद झाली. तर, हिमाचल जिंकत कॉंग्रेसने अद्यापही भाजपला हरवण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. अर्थात, त्या निकालांचा संबंध यात्रेशी जोडता येऊ शकणार नाही.
यात्रेचा निवडणुकांवरील नेमका परिणाम जाणून घेण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या राजकीय रणसंग्रामांची प्रतीक्षा करावी लागेल. नव्या वर्षात कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान यांसारख्या महत्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या तिन्ही राज्यांतून यात्रेने मार्गक्रमण केले. त्यामुळे तेथील निवडणुकांच्या निकालांविषयी मोठे औत्सुक्य असेल.
कॉंग्रेस पक्ष आता प्रत्यक्षपणे जनतेशी जोडला गेल्याचे चित्र यात्रेने पुढे आणले आहे. यात्रेमुळे कॉंग्रेसजनांमध्ये बऱ्याच प्रमाणात उत्साह संचारला आहे. त्याशिवाय, राहुल यांना यापुढे गांभीर्याने घ्यावे लागेल, असा इशाराही यात्रेने कॉंग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यांना दिला आहे. देशातील पुढील लोकसभा निवडणूक 2024 या वर्षी होणार आहे. ती निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन ताकदीने राजकीय मार्गक्रमण करण्यासाठी यात्रा कॉंग्रेसला मदतीचा हात देऊ शकेल.