नवी दिल्ली – गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी फारुकला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या शिक्षेविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्या. पी.एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासोर या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.
उच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबर 2017 रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. गेली 17 वर्षे म्हणजे 2004 पासून आरोपी फारुक हा कारागृहात आहे. त्याने निम्म्याहून अधिक शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
या जामीन अर्जाला गुजरात सरकारच्या वतीने विरोध करण्यात आला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुजरात सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले, साबरमती एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचा फारूकवर आरोप आहे. धावत्या रेल्वेवर दगडफेक करणे हा गंभीर गुन्हा नाही. साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लावण्यात आली होती.
त्यातील प्रवाशांना बाहेर पडता येऊ नये, यासाठी आग लागलेल्या डब्यावर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत 59 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे फारुकचा गुन्हा गंभीर आहे. त्याला जामीन मंजूर करू नये. त्याच्या अपील याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.
दरम्यान, ग्रोधा जळीतकांड 27 फेब्रुवारी 2002 रोजी घडली. त्यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या दंगलीत अनेकांचा बळी गेला. या प्रकरणाचा खटला गुजरात बाहेर चालवावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार या घटनेतील काही दोषी अधिकाऱ्यांचे खटले मुंबईत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही या दंगलीचे आरोप होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल देत पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोप फेटाळून लावले व त्यांना क्लीन चिट देण्यात आली.