Rahul Gandhi : राहुल गांधींची उद्धव ठाकरेंना एकजुटीने लढण्याची ग्वाही

Rahul Gandhi | Uddhav Thackeray – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. उद्धव यांना शुभेच्छा देतानाच राहुल यांनी एकजुटीने लढण्याची ग्वाहीही दिली.
उद्धव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राहुल यांनी सोशल मीडियावरून त्यांच्याविषयी सदिच्छा व्यक्त केली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितांची आणि अधिकारांची लढाई आपण एकमेकांच्या साथीने लढू, असे त्यांनी उद्धव यांना उद्देशून म्हटले.
राहुल यांनी उद्धव यांचा उल्लेख इंडिया आघाडीतील सहकारी म्हणून केला. त्यातून उद्धवसेनेशी झालेली आघाडी आणखी मजबूत बनवण्यास कॉंग्रेस उत्सुक असल्याचा संदेश दिला गेला.
कॉंग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक आहेत. ते तिन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या इंडिया आघाडीचेही भाग आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन काही दिवसांपूर्वी सुरू झाले. त्याआधी इंडिया आघाडीची ऑनलाइन बैठक झाली. त्यामध्ये २४ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले. त्यामुळे एकजूट टिकवण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले.
आता राहुल यांनी केलेल्या उद्धव यांच्या अभीष्टचिंतनातून इंडिया आघाडीतील मोठा पक्ष या नात्याने कॉंग्रेस इतर पक्षांना एकत्रित ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणार असल्याचे सूचित झाले.





