Rahul Dravid Resigns : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! राहुल द्रविडने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

राजस्थान रॉयल्सकडून घोषणा –
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट करत द्रविड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. फ्रँचायझीने लिहिले, “राहुल द्रविड आयपीएल २०२६ पूर्वी राजस्थान रॉयल्ससोबतचा आपला कार्यकाळ संपवत आहेत. राहुल गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या पिढीवर प्रभाव टाकला, संघात मजबूत मूल्यांची पायाभरणी केली आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर अमिट छाप सोडली.”
मुख्य प्रशिक्षकपदाऐवजी देण्यात आली होती मोठ्या पदाची ऑफर –
Official Statement pic.twitter.com/qyHYVLVewz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 30, 2025
फ्रँचायझीने पुढे सांगितले की, द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदाऐवजी दुसऱ्या मोठ्या पदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती नाकारत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. “संरचनात्मक पुनरावलोकनांतर्गत राहुल यांना मोठ्या पदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. राजस्थान रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते राहुल यांच्या फ्रँचायझीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात,” असे फ्रँचायझीने म्हटले.
हेही वाचा – Amir Jamal : ‘मला का वगळलं, स्पष्टीकरण द्या…’, आमिर जमालचा पीसीबी आणि निवड समितीवर हल्लाबोल
राहुल द्रविड २०११ ते २०१५ या काळात राजस्थान रॉयल्ससाठी खेळाडू आणि नंतर कर्णधार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांनी फ्रँचायझीमध्ये प्रशिक्षक म्हणून पुनरागमन केले. मात्र, २०२५ चा आयपीएल हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी निराशाजनक ठरला. १४ सामन्यांत केवळ ४ विजय मिळवत संघ ८ गुणांसह गुणतक्त्यात नवव्या स्थानावर राहिला. २००८ मध्ये पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर एकही खिताब जिंकता आलेला नाही. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने यशस्वी कामगिरी केली होती, परंतु राजस्थान रॉयल्ससोबतचा त्यांचा हा दुसरा कार्यकाळ अपेक्षेनुसार यशस्वी ठरला नाही.





