Arunachal Pradesh – अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यातील निगलोक सैनिकी शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पीडिताची बहीण ताडू लुनियाने वरिष्ठांवर रॅगिंगचा आरोप केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हीडीओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, ३१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास दहावीचे आठ विद्यार्थी आणि आठवीतील तीन विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घुसले. यानंतर वरिष्ठांनी सातवीच्या विद्यार्थ्यांना धमकावले आणि तिच्या भावाला जबरदस्तीने दहावीच्या वसतिगृहात नेले. लुनिया म्हणाली की, तिच्या भावाचा रात्रभर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. लुनिया म्हणाली की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिचा भाऊ सकाळी ५:४५ च्या सुमारास त्याच्या वसतिगृहाबाहेर दिसतो. थोड्याच वेळात तो एका रिकाम्या वर्गात गेला, जिथे त्याची सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिले होते वरिष्ठांनी मला खूप त्रास दिला, आता काय करावे हे मला कळत नाही. १ नोव्हेंबर रोजी एका १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला. शाळेतील कर्मचा-यांना सकाळी मृतदेह आढळला तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आठ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरू केली आहे.