पिंपरी | मावळ राष्ट्रवादीत तिकीटावरून रस्सीखेच

पिंपरी, (वार्ताहर) – विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यापासून राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. मावळ विधानसभेत देखील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहेत. मावळात सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आमदार आहेत.
सुनील शेळके हे दुसऱ्यांदा निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज आहेत. मात्र यावेळी त्यांना उमेदवारीबाबत त्यांच्याच पक्षातील बापूसाहेब भेगडे यांचे आव्हान आहे. नुकतीच बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला उमेदवारी हवी आहे, अशी इच्छा पुन्हा बोलून दाखविली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी बापूसाहेब भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली. तशी प्रसिद्ध सोशल मीडियात करण्यात आली.
परंतु ही बाब समोर येताच बापूसाहेब भेगडे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, सचिन घोटकुले उपस्थित होते.
महामंडळ नाकारले –
पत्रकार परिषदेत बोलताना बापूसाहेब भेगडे यांनी महामंडळावर मिळणारे पद नाकारले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजले.
या पदाची मी कोणत्याही प्रकारची मागणी केली नव्हती अथवा त्यासाठी अर्ज केला नव्हता, तरीही मला पक्षाने जे पद दिले आहे. ते मला मान्य नाही. मला त्या पदावर कोणत्याही प्रकारचा काम करण्याचा रस नाही.” असे भेगडे यांनी सांगितले.
उमेदवारीची मागणी कायम –
महामंडळावरील नियुक्ती नाकारत असताना भेगडे यांना विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मावळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझी मावळ विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी. तसे न झाल्यास मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन माझी पुढील भूमिका स्पष्ट करीन”, असे बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना – आमदार शेळके
आमदार सुनील शेळके यांना तालुक्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी, उमेदवारी मागण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला आहे. मी अद्याप तशी मागणी केलेली नाही.
परंतु पक्षश्रेष्ठी उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करुन काम केले पाहिजे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचे काम महायुतीतील घटकपक्षातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे करायला पाहिजे, असे सुनील शेळके म्हणाले. यामुळे आता मावळ विधानसभेचे तिकीट नक्की कुणाला मिळणार? हे पाहावे लागेल.





