French Open 2024 : लाल मातीचा सम्राट नदालवर पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…

French Open 2024 & Rafael Nadal : फ्रेंच ओपन क्ले कोर्टवर (लाल मातीचं कोर्ट) खेळली जाते आणि लाल मातीचा बादशहा म्हणून राफेल नदालची जगभरात ख्याती आहे. नदालने 14 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले आहे. नदाल हा सर्वाधिक वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. पण आता लाल मातीच्या बादशहाला फ्रेंच ओपन 2024 च्या पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. फ्रेंच ओपनच्या पहिल्याच फेरीत नदालला पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जर्मनीच्या चौथ्या मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेवने सोमवारी पहिल्या फेरीच्या लढतीत नदालचा 6-3, 7-6(7-5), 6-3 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर नदालने दुसऱ्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी मिळवली होती. लढतीमधील दहाव्या गेमला दोन ब्रेक पॉइंट वाचवून झ्वेरेवने ‘सर्व्हिस’ राखली आणि त्यानंतर टायब्रेकरमध्ये बाजी मारली. तिसऱ्या सेटलाही नदाल सुरवातीलाच ब्रेकची संधी साधून 2-0 असा आघाडीवर होता. या वेळीही झ्वेरेवने लगेच बाजी मारून 2-2 अशी बरोबरी साधली. सातव्या गेमला आणखी एकदा नदालची ‘सर्व्हिस’ भेदत झ्वेरेवने मिळवलेली आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
नदालने आपल्या प्रदीर्घ आणि सुवर्ण कारकिर्दीत प्रथमच क्ले कोर्टवर सलग दोन सामने गमावले आहेत. क्ले कोर्टवरील या ग्रँडस्लॅममधील त्याचा कारकिर्दीचा विक्रम आता 112-4 असा आहे. याआधी फ्रेंच ओपनमध्ये तो केवळ तीनच सामने हरला होता. कारकीर्दीत एकूण 22 ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळविणाऱ्या नदालने सर्वात प्रथम 2005 मध्ये फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर 2022 मध्ये तो येथे अखेरची स्पर्धा जिंकला. त्यानंतर मात्र दुखापतीने नदालच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, राफेल नदालची ही शेवटची फ्रेंच ओपन आहे. त्याला पाहण्यासाठी 15000 चाहते जमले होते. सामन्यानंतर चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिवादन केले.
बावीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदाल 3 जून रोजी 38 वर्षांचा होईल. तो जानेवारी 2023 पासून हिप आणि पोटाच्या दुखापतींशी झुंज देत आहे. या वर्षी त्याने 15 सामने खेळले आणि त्याचा रेकॉर्ड 8-7 असा होता. दुखापतींमुळे त्याचे रँकिंग 275 व्या स्थानावर घसरले आणि फ्रेंच ओपनमध्ये तो पहिल्यांदाच बिगरमानांकित झाला. या कारणास्तव, पहिल्या फेरीतच, त्याचा सामना चौथ्या मानांकित झ्वेरेव्हशी झाला, जो 2020 च्या यूएस ओपनचा उपविजेता होता, त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि गेली तीन वर्षे प्रत्येक वेळी येथे उपांत्य फेरी गाठणारा तो एकमेव खेळाडू आहे.
French Open 2024 : पहिल्याच फेरीत सुमित नागलला पराभवाचा धक्का….
फ्रेंच ओपनमधील चौथा पराभव…
राफेल नदालने संकेत दिले होते की, 2024 हा त्याचा शेवटचा हंगाम असेल. परंतु शनिवारी त्याने म्हटले होते की, फ्रेंच ओपनमध्ये पुन्हा खेळणार नाही याची मला 100 टक्के खात्री नाही. सोमवारी झालेल्या पराभवानंतरही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. यापूर्वी तो फ्रेंच ओपनमध्ये 2009 मध्ये रॉबिन सॉडरलिंगकडून आणि 2015 आणि 2021 मध्ये नोव्हाक जोकोविचकडून हरला होता. आता फ्रेंच ओपनमधील त्याचा हा चौथा पराभव ठरला.





