रायबरेली की वायनाड? राहुल गांधी सोमवारी जाहीर करणार निर्णय

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघांमधून यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी विजयी झाले. त्यातील कुठला मतदारसंघ सोडायचा आणि कुठल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे याविषयीचा निर्णय ते सोमवारी जाहीर करणार असल्याचे समजते.
राहुल यांनी दोन्ही मतदारसंघांमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यापैकी एक मतदारसंघ त्यांनी सोडणे अनिवार्य आहे. मात्र, त्याविषयी निर्णय घेताना मोठीच संभ्रमावस्था निर्माण झाल्याची कबुली स्वत: राहुल यांनीच नुकतीच दिली.
अर्थात, कॉंग्रेसचे व्यापक हित विचारात घेऊन राहुल वायनाड सोडतील, असे संकेत पक्षाच्या केरळमधील नेत्यांनी दिले आहेत. रायबरेली हा मतदारसंघ कॉंग्रेसचा आणि विशेषत: गांधी परिवाराचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.
त्यामुळे राहुल रायबरेलीलाच पसंती देण्याची सर्वांधिक शक्यता आहे. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी राहुल यांनी त्या राज्यातील खासदार असणे कॉंग्रेसच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. ती बाबच राहुल यांच्या निर्णयामागील पार्श्वभूमी ठरू शकते.





