Pune News : PVPIT च्या माजी विद्यार्थ्याचे एमपीएससीत यश; मंगेश पवारची पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून निवड

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पाटबंधारे विभागातील अभियंता वर्ग-2 (MES 2023) परीक्षेत जे.एस.पी.एम. शिक्षण संस्थेच्या पीव्हीपीआयटी, बावधन येथील माजी विद्यार्थी मंगेश विठ्ठल पवार याची अभियंता म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल जे.एस.पी.एम. शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मंगेशचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पवार, डॉ. यादव, डॉ. बागल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुण्यात पाच शैक्षणिक संकुलांद्वारे कार्यरत असलेली जे.एस.पी.एम. शिक्षण संस्था अभियांत्रिकी शिक्षणासह स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना सुसज्ज सुविधा पुरवते. यामुळे संस्थेचे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवताना दिसत आहेत. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उच्च पदांवर पोहोचण्याची संधी मिळावी, या दृष्टिकोनातून कार्य केले आहे. मंगेशच्या यशाचे कौतुक करताना त्यांनी म्हटले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा यशस्वी वाटचालीद्वारे इतरांना प्रेरणा द्यावी. मंगेशचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
सत्कारावेळी मंगेश पवार म्हणाले, “जे.एस.पी.एम. शिक्षण संस्थेने मला स्पर्धा परीक्षेकडे वळण्याची प्रेरणा दिली. महाविद्यालयातील प्राध्यापक गार्डियन फॅकल्टी मेंबर (GFM) म्हणून सतत संवाद साधतात, ज्यामुळे वैचारिक देवाणघेवाण होते. संस्थेने पुरवलेल्या सुविधा आणि मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकलो. इतर विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे मला वाटते.”
जे.एस.पी.एम. शिक्षण संस्थेबद्दल बोलायचे झाले तर ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मंगेश पवार याच्या यशाने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि मार्गदर्शनाची पावती पुन्हा एकदा मिळाली आहे.





