PV Sindhu Badminton : पीव्ही सिंधूने जर्मनीत फडकवला तिरंगा! हायलो ओपनचे जेतेपद पटकावत जिंकली वर्षातील दुसरी मोठी ट्रॉफी
PV Sindhu Champion : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने हायलो ओपन सुपर 500 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात तिने डेन्मार्कच्या लाइन होजमार्क क्येरफेल्डचा २१-१२, २१-१४ असा पराभव केला.

PV Sindhu Champion Hylo Open Super 500 Badminton Title 2026 : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने आपल्या शानदार फॉर्मचे प्रदर्शन करत भारतीय क्रीडाप्रेमींना दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या हायलो ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने डेन्मार्कच्या लाईन होजमार्क कजेरफेल्ट हिचा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर मोहर उमटवली. सिंधूचे या हंगामातील हे दुसरे मोठे जेतेपद असून, यापूर्वी तिने जुलै महिन्यात प्रतिष्ठेच्या जपान ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
३९ मिनिटांत उडवला धुव्वा; २१-१२, २१-१४ ने एकतर्फी विजय –
माजी जागतिक विजेती आणि सध्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले. जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानी असलेल्या डॅनिश खेळाडूला तिने अवघ्या ३९ मिनिटांत २१-१२, २१-१४ असे पराभूत केले. स्पर्धेत दुसरी मानांकित असलेल्या सिंधूने आपल्या वेगवान हालचाली, अचूक कोर्ट कव्हरेज आणि उत्कृष्ट नेट प्लेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या आशा पल्लवित –
SHE’S A SUPER 500 CHAMPION! 🇮🇳🏆
PV Sindhu seals the Hylo Open 2026 title with a dominant 21-12, 21-14 win over World No. 25 Line Kjærsfeldt in the final! 🔥
#PVSindhu #HyloOpen2026 https://t.co/L7OwhtE02q
— FanCode (@FanCode) November 1, 2026
या जेतेपदामुळे सिंधूला महत्त्वपूर्ण ९२०० रँकिंग पॉईंट्स मिळाले असून, वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या BWF वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र ठरण्याच्या तिच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते; मात्र हायलो ओपनमध्ये तिने कोणतीही चूक केली नाही. या विजयासह सिंधूने लाईनविरुद्धचा आपला हेड-टू-हेड रेकॉर्ड ७-१ असा आणखी मजबूत केला आहे.
पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासूनच वर्चस्व –
Champion style! 👑🏸
PV Sindhu powers through to claim the HYLO Open 2026 title in style. https://t.co/tc5cjsQK3w
— BAI Media (@BAI_Media) November 1, 2026
अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने क्रॉस कोर्ट विनर मारत आश्वासक सुरुवात केली. सुरुवातीला स्कोअर ३-३ असा बरोबरीत असताना सिंधूने आक्रमक चाली रचत मध्यंतरापर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूने सलग गुण वसूल करत धावसंख्या १७-१२ वर नेली आणि अवघ्या काही मिनिटांत पहिला गेम २१-१२ असा सहज जिंकून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्येही वर्चस्व राखत जिंकली ट्रॉफी –
दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा कायम राहिला. तिने सुरुवातीलाच ६-३ अशी आघाडी मिळवली. लाईनने गुणसंख्या ६-७ अशी कमी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सिंधूने लगेच सामन्यावर पकड घेतली. डेन्मार्कच्या खेळाडूने केलेल्या चुकांचा फायदा उठवत सिंधूने १७-११ अशी मोठी आघाडी घेतली. अखेर सलग ६ चॅम्पियनशिप पॉईंट्स मिळवत सिंधूने दुसरा गेम २१-१४ ने जिंकून दिमाखात ट्रॉफी उंचावली.





