मुंबई वाचवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवा, एकजुटीने काम करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती विजयी होण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून मुंबई वाचवण्यासाठी ठाकरेसेनेसोबत एकजुटीने काम करा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. रंगशारदा सभागृहात राज ठाकरे आपल्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
काही लोक मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी योजना आखल्या जात आहेत. मुंबईला तोडण्याचे हे स्वप्न नष्ट केले पाहिजे. मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आहे. ही निवडणूक मराठी माणसासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्रापेक्षा कोणतीही लढाई मोठी नाही. या महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने पक्ष कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे.
मुंबई वाचवण्यासाठी तुमचे मतभेद बाजूला ठेवा. पक्ष कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या उमेदवारांच्या प्रचारात भाग घेतला पाहिजे. ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी देखील त्याच प्रकारे सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले एबी फॉर्म आज वितरित केले जातील. काही प्रभागांसाठी शेवटच्या क्षणी चर्चा सुरू आहे. युती झाल्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने पक्ष कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांनी निराश होऊ नये आणि ही शेवटची निवडणूक नसल्याचे त्यांनी म्हटले.
एबी फॉर्मचे वाटप सुरु
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु केले. मुंबईत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वत: राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना एबी फॉर्म दिला. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, उपस्थित होते.
राज ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळताच यशवंत किल्लेदार भावूक झाल्याचे दिसले. माझ्यासाठी ही भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे. माझा कंठ दाटून आला आहे, अशी किल्लेदार यांनी यावेळी भावना व्यक्त केली. दरम्यान, मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी ठाकरेसेनेने कुठलीही यादी जाहीर केली नाही. मात्र, त्यांच्याकडुन आतापर्यंत 90 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आल्याचे समजते.





