Raj Thackeray : “तुमच्या मताची किंमत शून्य झालीये”; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप
Raj Thackeray : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत असताना सत्ताधारी मात्र खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणात व्यस्त आहेत.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वाचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडत आहे. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत असताना सत्ताधारी मात्र खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणात व्यस्त आहेत. सत्ता टिकवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली जात आहे, तर लोकप्रतिनिधी पैशांसाठी पक्ष बदलत असल्याची टीका त्यांनी केली. (Raj Thackeray)
जनतेने मतदानासाठी तासन्तास रांगेत उभे राहून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात पक्षांतर करत असतील, तर अशा नेत्यांना पुन्हा निवडून द्यायचे का, याचा गंभीरपणे विचार नागरिकांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : Dhanush and Mrunal Thakur : एकत्र दिसले, डेटिंगची चर्चा रंगली; आता धनुष-मृणालने घेतला मोठा निर्णय?
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी देशातील वाढत्या आत्महत्या, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या, नीट परीक्षेतील गैरव्यवहार, तसेच मुली आणि लहान मुलांच्या तस्करीसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. एवढे महत्त्वाचे प्रश्न देशासमोर उभे असताना सत्ताधाऱ्यांचे लक्ष मात्र फोडाफोडीच्या राजकारणाकडे असल्याची टीका त्यांनी केली.
“आज तुमच्या मताची किंमत शून्य झाली आहे. मतदान करा आणि घरी जा, एवढीच तुमची भूमिका उरली आहे का?” अशी खंत व्यक्त राज ठाकरेंनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त केला. तसेच यामुळे लोकशाहीच्या मूल्यांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? (Raj Thackeray)
“तुमच्या मताला किंमत काय आहे? शून्य! कोण तुम्ही? कोणीच नाही! रांगेत उभे राहा, मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडून सुरू होईल; काही पक्षांकडून याच्या अगोदर पण अशी फोडाफोडी झाली आहे. याला निवडणूक म्हणतात का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
आज सगळी लोक विकली जात आहेत : राज ठाकरेंचा हल्लाबोल (Raj Thackeray)
पुढे बोलताना ते म्हणाले, हे ऐकलं तेव्हा म्हटलं, बरं झालं आपला खासदार निवडून नाही आला! पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी विसरून जात आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जात आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जात आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जात आहोत, देशाची परंपरा विसरून जात आहोत. चहूबाजूंनी आम्ही काय बघतोय, आज सगळी लोक विकली जात आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा : Richa Agnihotri: रिचा अग्निहोत्रीने गुपचूप उरकले लग्न; सुंदर लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष






