Purandar News: खळद येथे नैसर्गिक ओढा बुजविण्याचा प्रकार? महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Purandar News: पुरंदर तालुक्यातील खळद येथे ओढ्यात सिमेंट पाईप टाकून पात्र बुजवण्याचा प्रयत्न; स्थानिक नागरिकांकडून चौकशीची मागणी.

Purandar News – पुरंदर तालुक्यातील खळद परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या लगत असलेल्या नैसर्गिक प्रवाहाच्या ओढ्यावर मोठ्या व्यासाचे सिमेंट पाइप टाकून ओढा बुजविण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कामामुळे नैसर्गिक जलप्रवाह बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून महसूल प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही हे पाइप तसेच ठेवण्यात आल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खळद रासकर मळ्या जवळील हा ओढा अनेक वर्षांपासून परिसरातील पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून नेण्याचे काम करतो. मात्र सध्या या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य टाकून तसेच सिमेंटचे पाइप बसवून नैसर्गिक प्रवाहात बदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
ओढ्याच्या पात्रात करण्यात आलेल्या या कामामुळे पावसाचे पाणी पूर्वीप्रमाणे वाहून जाण्याऐवजी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती असून शेतजमिनीही आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास ओढ्यातून येणारे पाणी पाइपच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्यास पाणी साचण्याची किंवा प्रवाह दुसऱ्या दिशेने वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या घरांना,
शेतीला तसेच रस्ते आणि इतर सार्वजनिक मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, नैसर्गिक नाले, ओढे किंवा जलमार्ग यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी संबंधित विभागांची परवानगी आवश्यक असते. पर्यावरणीय परिणामांचा विचार करूनच अशा कामांना मंजुरी दिली जाते. मात्र खळद येथील या कामाबाबत नेमकी कोणत्या विभागाची परवानगी घेण्यात आली आहे,
याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. ओढ्याच्या पात्रात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून त्याबाबत आवश्यक ती चौकशी व कारवाई करणे अपेक्षित असताना, अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे का,
असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे नैसर्गिक जलप्रवाहात हस्तक्षेप केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यापूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये नाले व ओढे बुजविल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खळद येथील परिस्थिती गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांचे मत आहे.





