Pune Konkan New Route – पुणे आणि कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा आणि निसर्गरम्य मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताम्हिणी घाट आता पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यातील दरडींचे संकट आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी नवीन बोगदा किंवा पर्यायी मार्गाचा आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार केला जात आहे. ताम्हिणी घाटाला सुरक्षित पर्याय मिळाल्यास दिघी पोर्ट आणि माणगाव औद्योगिक क्षेत्राला पुण्याशी जोडणे सोपे होईल. रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट येथे जाण्यासाठी पुणे- चांदणी चौक- पौड- ताम्हिणी – माणगाव- दिघी असा मार्ग आहे. पुणे ते दिघी पोर्ट या रस्त्याला केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. आता ताम्हिणी घाट हा मोठा असल्याने, तसेच वळणे असल्याने प्रवासासाठी वेळ लागतो. दिघी पोर्ट येथे जड वाहने जाण्यासाठी प्रशस्त मार्ग असणे आवश्यक आहे. जेणेकरून पुण्याहून कोकणात लवकर जाणे शक्य होईल. यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला याचा फायदा होईल. परिणामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ताम्हिणी घाटाला पर्यायी मार्गाचा विचार करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने ताम्हिणी घाट येथे जाण्याऐवजी पानशेतमार्गे- माणगाव – दिघी पोर्ट सा रस्ता तयार करणे असा एक पर्याय पुढे आला आहे, तर दुसरा पर्याय सध्याच्या मार्गावरील रस्ता रुंद करून वळणे काढून पुढे डोंगरवाडी ते ताम्हिणीदरम्यान बोगदा मार्ग करणे असा एक पर्याय पुढे आला आहे. प्राधिकरणाकडून प्रामुख्याने घाटरस्त्याचे अंतर कमी करून प्रवास अधिक सुखकर करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची प्राथमिक माहिती जमा करण्याचे आणि नवीन मार्गाची आखणी करण्याचे काम हाती घेतल्याच्या वृत्तास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे पर्यायाची गरज ताम्हिणी घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत, तसेच या ठिकाणी पावसाचे प्रमाणही अधिक असल्याने दरड कोसळून अपघात होतात. पावसाळ्यात शनिवार- रविवारी पर्यटकांच्या गर्दीमुळे या घाटात लांबच लांब रांगा लागतात. घाटातील तीव्र वळणांमुळे अवजड वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ते अरुंद असल्यामुळे मालवाहतुकीची मोठी वाहने वळविण्यास अडचणी येतात, तसेच ओव्हरटेक करणे अवघड जाते.