Purandar News: “अल्प पावसानंतर आता वन्यप्राण्यांचा धुमाकूळ!” वाल्हे परिसरात रानडुकरांकडून बाजरी पिकाची नासधूस
Purandar News: पिंगोरी परिसरातील बिबट्याच्या भीतीने वन्यप्राण्यांची मानवी वस्ती अन् शेतांकडे धाव; कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी.

Purandar News- दौंडज (ता. पुरंदर) येथील शेतकरी रमेश घोगरे यांच्या दौंडज येथील लळमाईदरामधील शेतातील उभ्या पिकांत रानडुक्कर व चिंकारांनी धुमाकूळ घातला आहे. हातातोंडाशी आलेले बाजरी पिकांचे मोठे नुकसान वन्यप्राण्यांना केले आहे. घोगरे यांचे हातातोंडाशी आलेले बाजरीचे पिक रानडुक्कराच्या कळपाने जमिनदोस्त केल्याने बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची संकटे पाठ सोडायला तयार नाही.
यावर्षी अल्प पर्जन्यमान त्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई याचा सामना करताना शेतातील उभी पिके वाचविण्याचा प्रयत्न शेतकरीवर्गामधून सुरू असताना वन्य प्राण्यांकडून शेतातील उभी पिके नष्ट केली जात आहे. विविध पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. उरलेल्या पिकांवर वन्यप्राण्यांचा धुडगुस वाढल्याने शेतकरी कमालीचे चिंतात्रस्त झाले आहेत.
काही दिवसांपासून अशा अनेक प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दररोज हे वन्यप्राणी करीत असून यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा; अशी मागणी येथील शेतकरी रमेश घोगरे यांनी केली आहे.
दौंडजनजिक पिंगोरी, कवडेवाडी भागामधील माळरानावर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. पिंगोरी परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर असून बिबट्याच्या तावडीतून वाचण्यासाठी हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. यामध्ये हरणांचे मोठे कळप, रानडुक्कर आहेत. हे प्राणी अंधार पडल्यानंतर शेतामध्ये घुसून उभ्या पिकांचे नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांनी बाजरी, सुर्यफूल, भुईमूग, मेथी, कोथिंबीर, ऊस, मका आदी पिकांची लागवड केली आहे. ही पिके उपलब्ध पाण्यावर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे.





