Sugarcane Crop Fire: शॉर्ट सर्किटने हाहाकार! साडेआठ एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे १० लाखांचे नुकसान
Sugarcane Crop Fire: आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथे वीज वाहक तारांच्या घर्षणाने दुपारी अचानक भीषण आग; ६०० टनांहून अधिक उस भस्मसात.

Sugarcane Crop Fire- काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी भोकरवाडी लिंगाळी परिसरात वीज वाहक तारांच्या घर्षणाने सोमवार, दि.२८ रोजी दुपारी लागलेल्या आगीत साडेआठ एकर ऊस जळून खाक झाला आहे. येथील चार शेतकऱ्यांचे अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केले आहे.
काठापुर बुद्रुक येथील भोकरवाडी लिंगाळी परिसरामध्ये आशा शांताराम घुले, विवेक घुले, अंजली घुले,विजया घुले या शेतकऱ्यांची शेती असून या शेतीमध्ये मागील वर्षी उसाची लागवड केली होती. सध्या ऊसाची पूर्ण वाढ झाली असून कारखाने सुरू झाल्यानंतर या ऊसाची तोडणी सुरू होणार होती. त्यामुळे तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस असल्याने ऊसाला आग लागल्यानंतर आग विझवणे अवघड झाले. सध्या एकरी सत्तर ते ८० टन ऊस उत्पादन निघाले असते. त्यामुळे सध्या साडेपाचशे ते सहाशे टन ऊस जळून खाक झाला आहे. कारखाने सुद्धा अजून 15 ते 20 दिवस सुरू होणार नसल्याने हा ऊस तोपर्यंत वाळून जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
उस जळाल्याने शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचे भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांनी सांगितले. काठापूर बुद्रुक गावामध्ये एमएसईबी बोर्डाचे सबस्टेशन आहे.येथून परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब तारा आहेत. या गावातील विजेचे खांब व तारांची दुरुस्ती ताडतीने करावी.अशी मागणी शेतकरी करत आहेत.





