Leopard News: शाळकरी मुलांसमोर अचानक आला बिबट्या! महाळुंगेत भरदिवसा थरार; ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत
Leopard News: आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे, साकोरे अन् नांदूर परिसरात बिबट्या व पट्टेरी तरसाचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शाळकरी मुलांमध्ये घबराट.

Leopard News- आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महाळुंगे, साकोरे, फुलेवाडी, टाकेवाडी, नांदूर आदी परिसरात बिबट्या आणि तरसाचा वावर वाढल्याने शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाळुंगे येथील नांदूर शिवाई मंदिरासमोरील वनहद्दीत पट्टेरी तरस आढळून आल्याची माहिती निवृत्त नमक अधीक्षक शिवाजीराव चिखले यांनी दिली.
महाळुंगे येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासवाडीच्या दिशेने जाणार्या ओढ्यात तसेच सैदवाडी परिसरातील ओढ्यात गुरुवारी (दि. 30) सायंकाळच्या सुमारास भरदिवसा बिबट्या रस्त्यावर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. या मार्गावर शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून शाळकरी मुलांमध्येही भीती निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी बिबट्याच्या वावराच्या खुणा तसेच दर्शनाची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना दिली आहे. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी मागील दोन दिवसांपासून पिंजरा लावण्यात आलेला नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या परिसरात बाराही महिने पाण्याची उपलब्धता असल्याने वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.
त्यातच सध्या ऊसपीक मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित आसरा मिळत आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे दिवसाही ऊस क्षेत्रातून बाहेर पडत असल्याने शेतकर्यांनी शेतात जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, परिसरात गस्त वाढवावी तसेच ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदाम पडवळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.





