प्रभात वृत्तसेवा पुणे – पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वत:हून पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. भूसंपादनासाठी संमतीपत्रे देण्याच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, मागील 15 दिवसांत सात गावांमधील 1 हजार 600 शेतकऱ्यांनी 1 हजार 750 एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत. यामध्ये सात गावांपैकी मुंजवडी गावातील सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिलेली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी दि. 25 ऑगस्टपासून समंतीपत्रे स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात झाली. मुंजवडी या गावातील सुमारे 76 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, आतापर्यंत 70 हेक्टर क्षेत्राची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी दिली आहे. संमती देण्यासाठी दि. १८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पुरंदर विमानतळ.. -एकूण संपादन क्षेत्र – सुमारे तीन हजार एकर – संमतीपत्र दिलेले क्षेत्र – सुमारे 1 हजार 750 एकर