Purandar Airport : एकरला १ कोटीपेक्षा जास्त दर? पुरंदर विमानतळाच्या निधीचा आकडा वाढला..वाचा सविस्तर
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी ५ ऐवजी ६ हजार कोटींचा खर्च; वाढीव दरामुळे सरकारवर कर्ज उभारण्याची वेळ, हुडकोला पाठवणार प्रस्ताव.

Purandar Airport – पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी कर्ज घेण्यात येणार आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना दिले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार असून, यासाठी सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिएकरी एक कोटी रुपयांहून अधिक दर देण्याचे ठरले असून, चार पट मोबदला व दहा टक्के जमीन परतावा देण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे.
गेल्या महिन्यात जमिनीचा एकरी दर, तसेच परताव्यापोटी देण्यात येणारे दहा टक्क्यांऐवजी वाढीव जमीन देण्यास राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वी ५ हजार कोटी रुपयांचा निधी लागेल,
असा प्रस्ताव राज्य सरकार दिला होता. त्यानंतर या घोषणेनंतर आता हा खर्च एक हजार कोटी रुपयांनी वाढून ६ हजार कोटी रुपये झाला आहे. यासाठी राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मान्य केल्यानंतर हुडकोकडे पाठविण्यात येणार आहे.




