Punjab Flood : “घर तुटलं पण हिम्मत नाही हारली ”… सोनू सूद पुन्हा धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

Punjab Flood : गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये आलेल्या भीषण पूरामुळे हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांचे घरं पाण्याखाली गेली, उपजीविकेचे साधन नष्ट झाले. मात्र या संकटाच्या काळात एक प्रेरणादायी कथा समोर आली आहे.
गुरुजोत नावाच्या एका लहान मुलाने आणि त्याच्या कुटुंबाने स्वतःच्या घराला वाचवण्यासाठी मदतीची वाट न पाहता स्वतःच मातीचा बंधारा बांधला. या धैर्यामुळे त्यांचे घर पाण्याखाली जाण्यापासून वाचले.
ही माहिती अभिनेता सोनू सूद आणि त्यांची बहीण मालविका सूद यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तत्काळ या कुटुंबाला भेट देण्याचा निर्णय घेतला. सोनू सूद यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या कुटुंबाची कथा सर्वांसमोर आणली. त्यांनी लिहिलं, “घर तुटलं आहे, पण हिम्मत अजूनही जिवंत आहे.”
कुटुंबाशी संवाद साधला
व्हिडिओमध्ये सोनू सूद या धैर्यवान कुटुंबाशी संवाद साधताना दिसतात. त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि लोकांनाही आवाहन केले की, “या कठीण काळात आपण सर्वांनी मिळून पूरग्रस्तांना मदत करायला हवी. तुमची सोबत हीच माझी खरी ताकत आहे.”
सोशल मीडियावर कौतुक
सोनू सूद यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. लोक त्यांना “खऱ्या आयुष्यातील हिरो” म्हणत आहेत. याआधी पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिनेही गावोगावी जाऊन पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि आवश्यक साहित्याचे वाटप केले होते.
आज सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. सोनू सूद आणि हिमांशी खुराना यांसारख्या कलाकारांच्या पुढाकारामुळे पूरग्रस्तांना या अंधःकारातही नवी आशा आणि धैर्याची किरण मिळत आहे.





