Sonu Sood : नेपाळमध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; मदतीला धावून आला ‘सोनू सूद’, मनीषा कोईरालाही भावुक !
सोनू सूदसोबत अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेही नेपाळमधील भीषण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये जन्मलेल्या मनीषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोकांना या संकटात नेपाळसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं.

Sonu Sood : नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केलं आहे. तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीच्या परिसरात आलेल्या भीषण महापुराने काही क्षणांतच गावं, रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या. अचानक आलेल्या या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून शेकडो नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे कैलाश मानसरोवर यात्रेसाठी निघालेले अनेक भारतीयही या आपत्तीच्या तडाख्यात सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, १०५ भारतीय नागरिक आणि ३७ अनिवासी भारतीयांसह जवळपास ४०० जणांचा संपर्क तुटला होता.
त्यानंतर बेपत्ता व्यक्तींच्या आकड्यात आणखी वाढ झाल्याचे अहवाल समोर आले आहेत. बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असताना भारताकडूनही नेपाळला मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
या भीषण संकटाच्या काळात बॉलिवूड अभिनेता आणि सामाजिक कार्यासाठी ओळखला जाणारा ‘सोनू सूद’ पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन देत सोनूने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली.
सोनू सूदची भावनिक पोस्ट
नेपाळमधील विदारक परिस्थिती समोर आल्यानंतर सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत तेथील नागरिकांना धीर दिला. “नेपाळ, तुम्ही एकटे नाही. अन्न, निवारा आणि पुनर्बांधणीसाठी मदत करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत येत आहोत,” असा संदेश त्याने दिला.
Nepal, you are not alone.
We are coming with food, shelter and the strength to help you rebuild. 🇳🇵❤️— sonu sood (@SonuSood) August 26, 2026
सोनूच्या या पोस्टमधून केवळ सहवेदना व्यक्त न करता प्रत्यक्ष मदत करण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाण्याच्या त्याच्या भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
मनीषा कोईरालाही भावुक
सोनू सूदसोबत अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेही नेपाळमधील भीषण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये जन्मलेल्या मनीषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोकांना या संकटात नेपाळसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं. मनीषाने ‘Pray for Nepal’ असा संदेश देत पूरग्रस्तांसाठी एकजुटीने प्रार्थना आणि मदत करण्याचं आवाहन केलं.
रस्ते, पूल, गावं वाहून गेली; बचावकार्य युद्धपातळीवर
महापुराच्या प्रचंड वेगामुळे रसुवा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठी नासधूस झाली आहे. रस्ते आणि पूल वाहून गेल्याने काही भागांचा संपर्क तुटला आहे. घरं, वाहनं आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. बचावकार्य करताना खराब हवामान, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि तुटलेले रस्ते यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
नेपाळच्या सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू असून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, भारतानेही नेपाळला आवश्यक मदत आणि बचावकार्यात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.






