Pune Rain : पुणेकरांनो काळजीपूर्वक लक्ष द्या! पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे; हवामान विभागाने काय सांगितलं?

Pune Rain : मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार बँटिग सुरू आहे. सोमवारपासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. पुणे शहरात पावसाची संततधार अजूनही कायम आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झालं आहे. सोमवारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. आता पुण्यासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत. याबाबत हवामान विभागाने काय सांगितलं आहे ते पाहूयात….
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दिवसांत पावसाचे चित्र कसे राहिल याबाबत माहिती दिली आहे. पुढील आठवडाभरात पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर याआधीच पुण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार शहरात आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
हवामान विभागाच अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस महत्वाचे असणार आहेत. पुढील दोन दिवस घाटमाध्यावर काही ठिकाणी अतिृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १९ व २० अॅागस्ट या दोन दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
नागरिकांना आवाहन
तसेच २१ अॅागस्टपासून पावसाचा जोर कमी होऊन हलक्या स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. २२ व २३ अॅागस्ट या दोन दिवशी ढगाळ वातावरण राहणार असून, या दोन दिवसांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने घाट माथ्यावर प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
सोमवारी किती पाऊस झाला?
सोमवारी झालेल्या पावसामुळे उपनगरांत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. नोकरीनिमित्त घराबाहेर पडलेल्यांची पाऊस आणि वाहतूक कोंडी यामुळे चांगलीच दैना झाली. पुण्याच्या वेगवेगळ्या भागांत, ग्रामीण परिसरामध्ये ३ ते २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
या भागात वाहतूक कोंडी
सोमवारी झालेल्या धुव्वाधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला. शहरात सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, नगर रस्ता, पेठांच्या मध्यवर्ती भागांतील रस्ते, उपरस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, कर्वेनगर या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा मोठा सामना करावा लागला. पावसाची संततधार अद्यापही सुरू असून महापालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुतीमधील मंत्र्याने दिली महत्त्वाची माहिती; “देवेंद्र फडणवीस लवकरच….”





