Pune ZP : जिल्हा परिषद सीईओंना भेटण्यासाठी सदस्यांना आता दोनच दिवस; नव्या नियमावर लोकप्रतिनिधी नाराज
Pune ZP : पुणे जिल्हा परिषद सीईओंची भेट घेण्यासाठी सदस्यांना सोमवार आणि गुरुवार दुपारी ३ ते ६ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. नव्या नियमावर सदस्यांनी आक्षेप घेतला.

Pune ZP : ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा परिषद या त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे अतिशय महत्त्वाचे पद मानले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांची विविध विकासकामे व प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना नेहमीच सीईओंच्या भेटीची आवश्यकता असते. पूर्वी सदस्य केव्हाही येऊन सीईओंची भेट घेऊ शकत होते. मात्र, आता नविन नियमानुसार सदस्यांना आता केवळ सोमवार आणि गुरुवारी दुपारी तीन ते सहा या वेळेतच सीईओंची भेट घेता येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर जिल्हा परिषद सदस्यांच्या भेटीच्या वेळेचा फलक लावण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सध्या या नवीन नियमांचीच चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्या भागातील समस्या आणि विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यालयात येतात. मात्र, आता आठवड्यातून फक्त दोनच दिवस आणि तेही प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच भेटण्याची सक्ती केल्यामुळे लोकप्रतिनिधींसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या फलकावर तीव्र आक्षेप घेत भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, लोकप्रतिनिधींना सीईओंना भेटण्यासाठी वेळ आणि दिवसाचे बंधन असेल तर कामे कशी मार्गी लागणार? तसेच नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्य यांना भेटण्याची वेळ एकच असल्याने कमी कालावधीत या सर्व लोकांना कसे भेटता येणार? हा प्रकार जिल्हा परिषद सदस्यांचा अनादर करणारा असल्याचे सांगत, जर सीईओंनी असा नियम केला, तर जिल्हा परिषदेमधील इतर अधिकारी सुध्दा असाच नियम करतील आणि उद्या पंचायत समितीमधील बीडीओ सुद्धा याच नियमांची पुनरावृत्ती करतील. यातून एकप्रकारे चुकीचा पायंडा पडण्याचा धोका आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा फलक त्वरित काढून टाकून सर्व सदस्यांना भेटण्यासाठी दिवस आणि वेळेचे बंधन असू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठराविक जिल्हा परिषद सदस्य सातत्याने बसत असल्याचे काही सदस्यांच्या निदर्शनास आले होते, जी बाब काहींना योग्य वाटली नाही. यावर उपाय म्हणून काही सदस्यांनीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून हा फलक बसविण्याचा अजब सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सर्व सदस्यांना समान संधी मिळेल असे वाटले होते; मात्र जेव्हा हा फलक प्रत्यक्षात प्रदर्शित करण्यात आला, तेव्हा हा प्रकार अखेर जिल्हा परिषद प्रशासनाच्याच अंगलट आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.





