Pune ZP election : ‘पुनश्च हरि ॐ’! तळेगाव ढमढेरे-रांजणगाव गटात प्रचाराची रणधुमाळी; कोणाचं पारडं जड?
Pune ZP election : तीन दिवसांचा शासकीय दुखवटा संपताच तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

Pune ZP election – महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेला तीन दिवसांचा शासकीय दुखवटा संपताच तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.
दुखवट्याच्या काळात थांबलेले प्रचार, बैठका आणि राजकीय हालचाली आजपासून पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल करत आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रचाराची मुदत वाढल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर आता या गटात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये थेट आणि चुरशीची लढत रंगताना दिसत आहे.भाजपाच्या अधिकृत उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे या विकासाभिमुख चेहरा म्हणून प्रभावीपणे पुढे येत आहेत. पक्षाची भक्कम संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यांच्या जोरावर गव्हाणे यांचा प्रचार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे.
दुखवट्यानंतर त्यांनी थेट मतदारांशी संपर्क वाढवत विकास आणि महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या सारिका राहुल कर्पे या शिवसेनेच्या पारंपरिक मतपेढीवर आणि आक्रमक प्रचारशैलीवर भर देत आहेत. त्यांनी घराघरांत पोहोचण्यावर अधिक भर दिला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
अपक्ष उमेदवार रेश्मा जयेश शिंदे या देखील मैदानातील तगड्या आव्हानकर्ता ठरत आहेत. पक्षीय चौकटीबाहेर जाऊन “स्थानिक प्रश्न आणि सामान्य माणसाचा आवाज” हा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. गावागावांत होणारा थेट संवाद आणि वैयक्तिक संपर्कामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार रेखा बांदल यांचा प्रचार सध्या काहीसा मर्यादित स्वरूपात सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने पुणे जिल्ह्यात मोठ्या सभा किंवा रॅली न घेण्याचे आदेश दिल्याने बांदल यांचा प्रचार प्रामुख्याने गृहभेटी आणि थेट संपर्कावर अवलंबून आहे. त्या आपल्या मागील पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहेत.
पुनश्च हरि ॐ…
तीन दिवसांच्या शांततेनंतर आज पुन्हा प्रचाराच्या वाहनांची वर्दळ आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाल्याने गटात निवडणुकीची चुरस तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रॅली आणि सभांवर निर्बंध घातल्याने, आता इतर राजकीय पक्ष आगामी काळात मोठ्या सभांचे आयोजन करतात की वैयक्तिक प्रचारावर भर देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






