Pune News : पुणे जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार! ४३७ किमीची आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा, २५० गावांचा समावेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची एकूण लांबी ४३७ किलोमीटर असून, सुमारे २५० गावांचा या मार्गात समावेश आहे. संपूर्ण स्पर्धा चार टप्प्यांत पार पडणार असून, प्रत्येक टप्पा सुमारे १०० किलोमीटर लांबीचा असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.पुणे येथे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई सायकलिंग महासंघ, युसीआय, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डुडी यांनी ही माहिती दिली.
यावेळी आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष तथा युसीआयचे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पीजीटीचे तांत्रिक संचालक पीनासी बायसेक उपस्थित होते.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २१० आंतरराष्ट्रीय सायकल फेडरेशनला निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत २५ देशांतील पथकांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे. युसीआयच्या निकषानुसार अधिकाधिक २४ पथके या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक पथकात चार खेळाडू असल्यामुळे एकूण १७६ खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांना सायकलचा वापर प्रोत्साहित करणे, निरोगी जीवनशैलीकडे समाजाला प्रवृत्त करणे, पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे, तसेच विदेशी पर्यटकांना पुण्याची ओळख करून देऊन पर्यटन क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पुणे जिल्हा जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.





