Pune ZP Election – जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पाबळ-केंदूर गटातून भारतीय जनता पक्ष हिवरे येथील विकास शिवाजी गायकवाड यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे आव्हान दिले आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा गट यंदा कोणत्याही परिस्थितीत काबीज करायचा, या जिद्दीने भाजपने आपली संपूर्ण ताकद गायकवाड यांच्या पाठीशी उभी केली आहे. गायकवाड यांनी गेल्या काही वर्षांत स्वनिधीतून केलेल्या कामांमुळे मतदारांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.विकास नाना गायकवाड यांनी स्थानिक गरजा ओळखून दुष्काळात स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा, सामुदायिक विवाह सोहळे, कोरोना काळात रेशन वाटप आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी हॉल बांधून देणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. याशिवाय रक्तदान शिबिरे, मंदिर उभारणीसाठी मदत, बैलगाडा शर्यतींना दिलेले प्रोत्साहन आणि महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घडवून आणलेला विमान प्रवास यांमुळे त्यांनी वैयक्तिक पातळीवर मोठा जनसंग्रह केला आहे. “मी केवळ माझे सामाजिक उत्तरदायित्व समजून ही कामे केली आहेत आणि त्याचीच पावती आज मतदार मला प्रेमाने देत आहेत,” अशी प्रतिक्रिया विकास गायकवाड यांनी व्यक्त केली. पाबळ-केंदूर गटातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या तातडीच्या मदतीची आठवण एका माजी सरपंचांनी करून देत, गायकवाड यांचा विजय निश्चित असल्याचे संकेत दिले. विकास गायकवाड यांसह त्यांचे सहकारी दीपक खैरे आणि आशा साकोरे यांसारख्या निरपेक्ष कार्यकर्त्यांना शासकीय मदतीचा हात मिळाल्यास या भागाचा कायापालट होईल, असा आशावाद नागरिकांमधून व्यक्त होत आहे.