ZP Election : एका जागेसाठी तीन दावेदार! पाबळ-केंदूर गटात दोन्ही राष्ट्रवादींसह भाजप मैदानात; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

प्रभात वृत्तसेवा
पाबळ – शिरूर तालुक्यातील पाबळ- केंदूर जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत अटळ असून दोन्ही राष्ट्रवादीसह भाजप या पक्षांचे उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई होण्याची दाट शक्यता आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ही हाय व्होल्टेज लढतीत प्रस्थापित आणि मातब्बर उमेदवारांची कसोटी पणाला लागणार आहे. प्रारंभी दुरंगी दिसणारी लढत तिरंगी होणार असल्याचा सूर आळवळा जात आहे. यात भाजपाचा भूमिका काय राहणार, हा फॅक्टर निणार्यक ठरणार आहे.
“वेळप्रसंगी युती अथवा मैत्रीपूर्ण लढत’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली गुगली आणि दोन्ही राष्ट्रवादीत निर्माण झालेली लढण्याची इर्षा त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची व पंचायत समितीच्या सभापती पदाची तीव्र अपेक्षा यामुळे यावेळची निवडणूक” घासून ‘ निर्णायक होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्याचे राजकारणात महायुतीमध्ये भाजपबरोबर “शकले’ झालेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेतील दिग्गज नेते आहेत. मात्र, जवळ घेऊन सत्तेतील,” महत्वाची ‘ मंत्रीपदे देताना भाजपने सत्तेचा “रिमोट आणि कंट्रोल’ आपल्या हातात कसा राहील याची दक्षता घेतली असल्याची वस्तुस्थिती आहे.
भाजपने केंद्र आणि राज्यात आपले बस्तान गेली पंधरा वर्षे भक्कम केले आहे. आता त्यांची दृष्टी स्थानिक स्वराज्य संस्थांवर नसेल हा भ्रम नक्कीच नसेल. त्यामुळेच मूळ प्रस्थापितांना आपली जहागिरी वाचवायची आहे तर भाजपला आपली जहागिरी तळागाळात न्यायची आहे. त्यानुसार सर्वच पक्ष आपापली लढत “वरून मैत्रीपूर्ण तर आतून सरळ’ अशीच करणार असल्याचे चित्र आहे.याचाच इफेक्ट केंदूर जिल्हा परिषद गट व गणात दिसणार आहे. त्यादृष्टीने तीन पक्षांनी आपापली अंतर्गत तयारी चालवली आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दोन मेळावे घेऊन आगेकूच करीत लढाईचे रणसिंग फुंकले गेले आहे. त्यादृष्टीने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना निर्वाणीचे डोस देऊन वस्तुस्थितीचे भान देताना उमेदवारी निवडीत मात्र कस लावून दिली जाणार असल्याचे सूचित केले आहे.आमची महाविकास आघाडी आहे. यातील सहभागी पक्षांशी चर्चा होऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
पाबळचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष मारुती शेळके यांनीही तीन दिवसांत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्याबरोबर बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे. उमेदवारीबाबत आग्रही भूमिका असल्याची माहिती दिली आहे.
पाबळचे रण तापू लागले..
पाबळ- केंदूरच्या मैदानात तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. तरीही जिल्हा परिषद निवडणुकात उमेदवाराची सधनता हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. तरी काही सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले उमेदवारही असणार आहेत. कदाचित जनतेने ठरवले तर वेगळे चित्र पुढे येऊ शकते असेही मत व्यक्त करणारे आहेत. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत आपापले उमेदवार कस लावून उतरवणार असल्याचे दिसत असल्याने चौरंगी लढतीकडे ही निवडणुका वळतील असा कयास जनतेतून व्यक्त केला जात आहे.





