Sanjay Raut : संजय राऊतांचे अमित शहा यांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
ठाकरेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आंदोलक मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Sanjay Raut : ठाकरेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आंदोलक मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रात म्हटले की, जरांगे यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे केलेले हे खुलासे अनेक दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. मात्र, यात ५०० कोटी रुपयांसारखी मोठी रक्कम गुंतलेली असणे ही सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब आहे.
या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ५०० कोटी रुपये कोणी कोणाला दिले? जर हे पैसे जरांगे यांच्यापर्यंत पोहोचले नसतील, तर ते कुठे गेले? इतकी मोठी रक्कम कुठून आली. हे प्रकरण मनी लाँड्रिंगचे एक स्पष्ट उदाहरण असल्याचे दिसते आणि त्या दृष्टीनेच याची चौकशी व्हायला हवी.
या प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळायला हवीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी मी आपणास विनंती करतो की, महाराष्ट्र पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश द्यावेत. सत्य जनतेसमोर आणावे आणि या घोटाळ्यात सामील असलेल्यांना अटक करावी, असे राऊत यांनी शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधत राऊत म्हणाले, शहा यांच्या नेतृत्वाखाली ईडी भारतात मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या तपासात आघाडीवर राहिली आहे. अगदी कमी रकमेच्या प्रकरणांचा तपास करण्यातही ईडीने आपली एक ओळख निर्माण केली आहे.
मार्च २०२१ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना दरमहा १०० कोटी रुपये गोळा करून देण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांचा हा केवळ एक आरोप होता, ज्याला कोणताही पुरावा नव्हता, तरीही ईडीने अत्यंत तत्परतेने यात हस्तक्षेप केला आणि देशमुख यांना अटकही केली, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.






