पुणे : प्राणी संग्रहालय ‘अनलॉक’ची प्रतीक्षा

पुणे – शहरात करोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही कात्रज येथील प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे, तर उद्यान विभागाने प्रशासनाच्या नियमावलीवर बोट ठेवत यासंदर्भात आपले हात झटकले आहेत.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि संशोधन केंद्र हे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे, तर इतर जिल्ह्यांमधूनही पर्यटक आवर्जून या प्राणी संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयात असलेले विविध प्रकारचे साप, हत्ती, वाघ, सिंह, अस्वल, तरस यांसारखे वन्यप्राणी पाहायला मिळतात, तर नव्याने शेकरू या राज्यप्राण्याची संग्रहालयात “एन्ट्री’ झाली आहे. त्यामुळे मुलांसोबतच मोठ्यांनाही प्राणी संग्रहालय पाहण्याची भुरळ पडते. मात्र, करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नुकतीच नियमावली शिथिल झाल्यानंतर प्राणी संग्रहालयदेखील पुन्हा खुले झाले असेल, या अपेक्षेने नागरिक प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी जात असतात. विशेषत: शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी प्राणी संग्रहालय परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, प्राणी संग्रहालय खुले झाले नसल्याने पर्यटकांची निराशा होत असून, गेटवरून त्यांना माघारी जावे लागत आहे. प्राणी संग्रहालय नेमके कधी खुले होणार? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
प्राणी संग्रहालयाची वेबसाइट ‘आउटडेटेड’
शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी येतात. मात्र, त्या ठिकाणी आल्यावर त्यांना समजते की ते बंद आहे. याबाबत प्राणी संग्रहालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने माहिती घ्यायची कशी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीदेखील पर्यटकांकडून केली जात आहे.
शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये राष्ट्रीय उद्याने आणि बागा, राखीव वनक्षेत्रे यांचा समावेश आहे. मात्र, त्यात प्राणी संग्रहालयाचा समावेश नाही. त्यामुळे प्राणी संग्रहालय खुले करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
– अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग





