Pune : युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण

पुणे : काँग्रेसच्या केंद्रीय समितीची कोणतीही मान्यता न घेता महाराष्ट्र युवक काँग्रेसने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखिल भारतीय युवक काँग्रेसने या नियुक्त्याच तात्काळ रद्द केल्या आहेत. यामुळे आता युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागल्याचे उघड होऊ लागले आहे.
राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी नवीन पदाधिकारी नियुक्त्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य काही नियुक्त्यांचा समावेश होता. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. या नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या असल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल, तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता घ्यावी लागते. मात्र तशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा, एहसान खान, कुमार रोहित यांनी नियुक्त्या रद्द केल्याचे पत्रक काढले आहे. कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
कार्यप्रणालीचा अवलंब बंधनकारकच
काँग्रेसमध्ये कोणालाही कोणाच्याही शिफारशीवरुन कोणत्याही थेट नियुक्त्या करता येत नाहीत. नियुक्त्या करण्याची कार्यप्रणाली ठरलेली असते. महाराष्ट्र युवक काँग्रेसने पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करताना कार्यप्रणालीचा, धोरणाचा अवलंब केला नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे कार्यप्रणालीशी छेडछाड करण्यात आल्याने संबंधित नियुक्त्याच रद्द झालेल्या आहेत. आता अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.





