Pune : स्वानंद प्राथमिक विद्यालयात योगदिन साजरा

पुणे – धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयात नुकताच योगदिन साजरा करण्यात आला. योगदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व समजावून सांगण्यात आले. हाताचे, मानेचे, पाठीचे, पोटाचे विविध व्यायाम प्रकार घेण्यात आले.
वृक्षसन, ताडासन, हलासून, नौकासन, भुजंगासन, पदमासन,वज्रसन असे विविध योगासनाची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. विद्यार्थांबरोबरच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदानी देखील योगाभ्यासात आपला सहभाग नोंदविला.
योगासनाबरोबरच विद्यार्थ्यांकडून मंडला योगा करून घेण्यात आला. मंडला योगासाठी किर्ती मनोरे आणि वंदना कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील इयत्ता सहावीमधील विद्यार्थी अनय यादवने उपस्थितांना इंग्रजीमधून योगदिनाची माहिती दिली. तसेच, दुसरीतील शौनक अग्निहोत्री व श्रीवत्स अग्निहोत्री विद्यार्थ्यांनी सूर्याची १२ नावे सांगितली. ही नावे घेत असताना शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केला. इ. ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी योगासनांची चित्रे काढली व त्याचे फायदे सांगितले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.श्रुती मनोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका दीपाली शेलार यांनी केले. अनुलोम, विलोम, कपालभाती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता घोषवाक्ये देऊन झाली.





