Pune: होय, मी रक्त दिले, पण कारण माहिती नाही; मुलाच्या आईची कबुली

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईला देखील शनिवारी (दि.१) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदललेल्या प्रकणात तिचा सहभाग असल्याच्या संशयातून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुलाच्या आईने आपण ससून रुग्णालयात रक्ताचा नमुना दिल्याची कबुली दिली आहे. पण, हे रक्त डॉक्टरांनी का घेतले हे आपल्याला माहिती नसल्याची सारवासारवही तिने केली.
कल्याणीनगर अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलावर भादंवि कलम ३०४,२७९,३३८,३३७,४२७, मोटार वाहन कायद्यानुसार येरवडा पोलीस गुन्हा दाखल असून, त्याच गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत आतापर्यंत पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कोझी आणि ब्लॅक पबचे व्यवस्थापक यांनाही अटक झाली आहे.
अपघातानंतर आरोपी मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याची आई उपस्थित होती. मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले दुसरे रक्त हे मुलाच्या आईचे असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हातील लागले आहेत. डाॅ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले. त्या जागी मुलाच्या आईचे रक्त घेण्यात आल्याचा संशय आहे.
त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. आपण केलेल्या कृत्याचा भविष्यात पोलिसांना किंवा रुग्णालयातील इतर कोणाला सुगावा लागू नये, म्हणून तेथील एका खोलीत मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नव्हती. मात्र, पोलिसांनी रुग्णालयतील इतर फुटेज ताब्यात घेतले. त्यात मुलाची आई दिसत आहे. तसेच रक्त नमुना घेताना तेथे उपस्थित असलेल्या कनिष्ठ डॉक्टर आणि परिचारिका अशा सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यामध्येही मुलाची आई उपस्थित असल्याचे उघड झाले.
मुंबई येथे केला मुक्काम
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि हरनोळ यांना अटक केल्यानंतर मुलीची आई मुंबईला निघून गेली होती. पोलीस तिला शोधत होते. दरम्यान, बाल सुधारगृहात असलेल्या मुलाची चौकशी करण्याची परवानगी पोलिसांना मिळाली होती. यासाठी घरातील एक सदस्य तेथे उपस्थित असणे आवश्यक होते. यामुळे मुलाची आई आणि २२ वर्षीय भावाला उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठवण्यात आले. ते पत्र आल्याचे समजताच मुलाची आई पुण्यात आली. मात्र, ती पुन्हा निघून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांच्या पथकाने तिला सकाळीच ताब्यात घेतले.





