PUNE: येरवडा कारागृह सीसीटीव्हीच्या निगराणीत ८१२ कॅमेरे बसवले; गैरप्रकारांवर आता थेट वाॅच

पुणे – कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी राज्यभरातील १६ मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून. या यंत्रणेचे उद्घाटन गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती साठे या वेळी उपस्थित होते. कारागृहातील गैरप्रकार रोखणे, तसेच कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयु्क्त ठरणार असल्याचे रस्तोगी यांनी नमूद केले.
कारागृहातील कैद्यांची हाणामारी, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी, कारागृहातील घडामोडी आणि कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर नियंत्रण कक्षातून कारागृहातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे, असे गुप्ता यांनी नमूद केले.
राज्यभरातील कारागृहांत यंत्रणा
कारागृहातील नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रूम) कॅमेरे जोडले जाणार आहेत. आता मुंबई मध्यवर्ती कारागृह-३२०, कल्याण- २७०, भायखळा-९०, अमरावती- १०६, नागपूर- ७९६ , नाशिक रोड-९४१, नाशिक किशोर सुधारालय- ८६, लातूर-४६०, जालना-३९९, धुळे-३३१, नंदुरबार-३६५, सिंधूदुर्ग-३१५, गडचिरोली खुले कारागृह – ४३४ या प्रमाणे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.





