PUNE: ई-लर्निंग इमारतीचे काम सात वर्षांपासून रेंगाळत

कात्रज – कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील अॅमिनिटी स्पेसच्या आरक्षित जागेत ई-लर्निंग स्कूल इमारतीचे काम सात वर्षांपासून रेंगाळलेल्या स्थितीत सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होणार याबाबत प्रशासन अद्यापही सकारात्मक उत्तर देत नाही. दि. २६ जानेवारी २०१६ला भूमिपूजन होऊन या इमारतीचे काम अजूनही सुरुच आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या इमारतीच्या या रेंगाळल्याने या इमारतीचे काम ठिसूळ झाले आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील विविध भागातील सोसायटीतील भागातील रहिवासी असलेल्या पालकातून नाराजी व्यक्त होत आहे. तत्कालीन नगरसेविका भारती कदम यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या प्रयत्नातून या कामासाठी पहिल्या टप्प्यात २०१६-१७च्या अंदाजपत्रकात सुमारे १ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
त्यानंतर २०१७ पासून तुटपुंज्या निधीची तरतूद करण्यात आली. पुन्हा २०२१-२२मध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, महागाईमुळे आता हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी किमान सुमारे पाच-साडेपाच कोटी रुपयांची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ई-लर्निंग स्कूलसाठी मिळालेल्या डिझाइनच्या मान्यतेप्रमाणे इमारत ही पार्किंग, अप्पर पार्किंग आणि वर पाच मजले अशाप्रकारे होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात पहिल्या फेजमध्ये बेसमेंट पार्किंग आणि वर तीन मजले एवढीच बांधण्यात येत आहे. एकूण डिझाइन प्रोजेक्टप्रमाणे तीन मजल्यांचे काम करण्यात येत असून तेही अपूर्ण आहे.
इमारतीचे तीन मजल्यांपर्यंत आरसीसी ढाच्या काम पूर्ण झाले आहे. तरीही तीन मजल्यांचेही फर्निचर, खिडक्या, रंगकाम, विद्युतकाम इत्यादी कामे बाकी आहेत.परंतु, आता ही कामे करण्याकरिता वाढीव निधीची गरज भासणार आहे.
“पुणे महपालिकेतर्फे ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीच्या कामासाठी एक कोटी रुपयांची मंजुरी दिली उर्वरित रंगकाम, खिडक्या व दरवाजे कामे केली जातील. इतर कामांसाठी निधीची मागणी केली असून कामाला गती देण्यात येईल.” – बापू बारवकर, कनिष्ठ अभियंता, भवन विभाग, महापालिका
“सात वर्षांपासून ई-लर्निंग स्कूल इमारतीचे काम अपुऱ्या निधीमुळे रेगाळलेल्या स्थितीत सुरू असून निधीसाठी पाठपुरावा करत आहे. आयुक्तांनी भरीव निधीची तरतूद करून काम पूर्ण करावे, याबाबत पालकमंत्री अजित पवार यांना कामास गती मिळावी याकरिता निवेदन दिले असून ते स्वतः लक्ष घालणार आहे.” – प्रकाश कदम, माजी नगरसेवक





