पुणे – गुगल पे एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे गुगलपेचा वापर करुन अनेकदा फसवणूक केली जाते किंवा बँक खात्यातून पैसे काढले जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात सायबर भामटे सक्रीय आहेत. मात्र अनेकदा घाईगडबडीत अशा प्लॅटफॉर्मचा वापर केला गेल्याने अनेक जण स्वत:हून बँक खात्यातील पैसे गमावून बसतात. अशीच एक घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका महिलेने रिक्षाचे ५० रुपये भाडे गुगल पे व्दारे देताना चुकून ५० हजार रुपये वर्ग केले. गडगड झाल्याचे लक्षात येइपर्यंत रिक्षा चालकाने मोबाईल फोन बंद करुन ठेवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, यातील महिला तक्रारदाराने (रा. बालाजीनगर, धनकवडी) हिने प्रवासादरम्यान रिक्षा चालक किरण यास चुकून ५० हजार रुपये गुगल पे केले होते. तीच्या निदर्शनास चूक लक्षात आल्याने तीने रिक्षा चालकास वेळोवेळी संपर्क केला. मात्र रिक्षा चालक हा कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. यामुळे त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे पोलीस हवालदार लायप्पा पुजारी यांनी तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा केला. त्यांनी रिक्षा चालकाला शोधून पोलीस ठाण्यात आणले. यानंतर तक्रारदार यांचे ५० हजार रुपये परत मिळवून दिले. पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तक्रारदार महिलेला तीचे पैसे परत मिळाले. यामुळे तक्रारदार महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे आभार मानले.