Pune : हिंजवडीची कोंडी फुटणार?

पुणे – आयटी पार्क, वाहतूक आणि जलकोंडीसाठी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सक्रिय झाली आहे. हिंजवडी परिसरात पर्यायी रस्ते तयार करणे, अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांसाठी भूसंपादन आदी कामे हाती घेतली आहे.
त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हिंजवडी, माण, म्हाळुंगे आणि मारुंजीतील नवीन रस्त्यांसाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आदेश प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार शंकर मांडेकर यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, जमीन व मालमत्ता विभागाचे हिम्मत खराडे यांच्यासह एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
४५ ऐवजी २४ मीटरचा रस्ता करा
भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना नियमानुसार टीडीआर किंवा मोबदला द्यावा लागणार आहे. या भागातून ४५ मीटर रस्त्याची आखणी होणार असल्याने गावालगतची अनेक घरे बाधित होतील. त्यामुळे गाव हद्दीत ४५ मीटर ऐवजी २४ मीटरचे रस्ते करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
हिंजवडी-माण मुख्य रस्त्याचे रुंदीकरण, जमीन भूसंपादन टीडीआर प्रकियेतील अडचणी, भूखंडांच्या मूल्यांकनाच्या अपेक्षा, नुकसानभरपाईच्या तक्रारीवर यावेळी चर्चा झाली. रुंदीकरणामुळे शेतकऱ्याचे आर्थिक किंवा कोणतेही नुकसान होणार नाही, याची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करावी, असे आदेश म्हसे यांनी दिले.





