Pune : फुले स्मारक विस्तारीकरण रखडणार?

पुणे – महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन वास्तू एकत्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन्ही स्मारकांना जोडणाऱ्या जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून, जागांच्या मोबदल्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात तब्बल ८५ टक्के जागा मालकांनी रोख रकमेऐवजी घराची मागणी केली आहे. विशेष म्हणजे एकाच जागेसाठी भाडेकरू, जागा मालक दोघांनाही घर हवे आहे.
नियमानुसार एकाच जागेसाठी जागा मालक आणि भाडेकरू अशा दोघांनाही मोबदला देता येत नाही. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी पालिकेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अनेक वर्षांपासून स्मारकाचे विस्तारीकरण रखडले आहे. शासनाने गेल्या वर्षी कामाला गती देण्यासाठी २०० कोटींचा निधी मंजूर केला.
मात्र, त्यानंतरही काहीच हालचाल झाली नसल्याने काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर स्मारकाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र उपायुक्तांची नेमणूक झाली. त्यानुसार स्वतंत्र चार पथके तयार करून, बाधितांना मोबदला कसा हवा आहे, याचे सर्वेक्षण पूर्ण केले.
८० टक्के बाधितांची घराची मागणी
सर्वेक्षणात जवळपास ८० टक्के भाडेकरू आणि ८० टक्के जागा मालकांनी घराच्या मोबदल्यात घराची मागणी केली आहे. काही व्यावसायिकांनी व्यावसायिक जागेच्या बदल्यात तशीच जागा मागितली आहे. काही जागा मालकांनी रोख रकमेची मागणी केली आहे.
स्मारकासाठी एकूण ११९ सर्व्हे आहेत. त्यामध्ये ३५८ जागा मालक, ६२४ भाडेकरू आणि सुमारे २५ झोपड्यांसह एकूण ९८२ बाधितांचा समावेश आहे. सर्वेक्षणासाठी चार क्लस्टर तयार केले होते. प्रत्येक क्लस्टरसाठी १२ जणांचे पथक नेमले होते. काही घरे केवळ १०० चौ. फुटांची, तर काही २ हजार चौ. फुटांपर्यंतची आहेत.
आयुक्त घेणार निर्णय
सर्वेक्षणाचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार असून, ते मोबदला कसा द्यायचा, याचे धोरण तयार करतील. मात्र, सध्याच्या नियमानुसार एकाच जागेसाठी दोघांना मोबदला देता येत नाही. एकाच जागेसाठी भाडेकरू, मालक दोघांनीही घराची मागणी केल्यामुळे नेमके काय करायचे, याबाबत प्रशासनाला मध्यममार्ग काढावा लागणार आहे, तसेच यासाठी शासनाची विशेष मान्यता घ्यावी लागणार आहे.





