Pune Wildlife : हिंस्त्र गोमेचं हळवं रूप! शेकडो पिल्लांना कवेत घेताना दिसली ‘माऊली’; पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Pune Wildlife : पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या सदस्यांकडून दुर्मिळ 'शतपादी' मादीच्या वात्सल्याचे चित्रण; निसर्गप्रेमींमध्ये फोटोंची जोरदार चर्चा.

Pune Wildlife – ऐतिहासिक राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गातील एक अत्यंत दुर्मिळ आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे निसर्ग अभ्यासक अनिल कानसकर यांना एका मादी गोमेने आपल्या शेकडो पिल्लांना पोटाशी कवटाळून त्यांचे रक्षण करतानाचे ‘मातृत्त्व दर्शन’ घडले. निसर्गप्रेमींमध्ये या दुर्मिळ क्षणाची सध्या मोठी चर्चा आहे.
कानसकर राजगड परिसरात फिरत असताना त्यांना एका दगडाखाली हा क्षण दिसला. मादी गोम आपल्या पांढऱ्या शुभ्र पिल्लांभोवती गोल घेरा करून, त्यांना स्वतःच्या पोटाशी कवटाळून बसली होती. निसर्गामध्ये रोज अनेक घडामोडी घडतात, मात्र हिंस्त्र किंवा विषारी समजल्या जाणाऱ्या प्राण्यांमधील ही मातृत्वाची भावना पाहून मन भारावून गेले, अशा भावना कानसकर यांनी व्यक्त केल्या.
गोम ही विषारी असून तिच्या दंशामध्ये ‘न्युरोटॉक्सिक’ विष असते. ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी दंश करू शकते. त्यामुळे अशा प्राण्यांना कधीही थेट हाताळू नये, असा सल्ला सर्पमित्र विशाल शिंदे यांनी दिला आहे. राजगड व भोर तालुक्यात अशा अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. मात्र, वनविभागाने या वन्यजीवांच्या नोंदी घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे अनिल कानसकर यांनी सांगितले.
काय सांगते विज्ञान?
गोम हा ‘संधिपाद’ गटातील प्राणी असून तिचे शरीर अनेक खंडांनी बनलेले असते. गोमेला ‘शतपादी’ म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात तिला नेमके १०० पाय नसतात; प्रजातीनुसार ही संख्या १५ ते १९१ जोड्यांपर्यंत असू शकते. ही प्रजाती मांसाहारी असून कीटक व इतर अपृष्ठवंशी प्राण्यांची शिकार करते. विशेष म्हणजे, मादी गोम आपल्या अंड्यांचे आणि पिल्लांचे भक्षकांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याभोवती वेटोळे घालून बसते. पिल्ले स्वावलंबी होईपर्यंत ती त्यांची पूर्ण निगा राखते.





