Ghodegaon Forest : सांबर, भेकर अन् तरस…घोडेगाव वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी प्रगणना; विविध प्राणी-पक्ष्यांची नोंद
Ghodegaon Forest : घोडेगाव वनपरिक्षेत्रातील विविध पाणवठ्यांवर मचाण उभारून वन्यप्राण्यांची नोंद; जैवविविधतेचा वेध घेण्यासाठी वनविभागाची विशेष मोहीम.

Ghodegaon Forest – बौद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव वनपरीक्षेत्रात वन्यप्राणी प्रगणना मोहीम राबविण्यात आली. विविध पाणवठ्यांवर मचाण उभारून वनविभागाच्या कर्मचार्यांनी रात्रभर निरीक्षण करत प्राणी व पक्ष्यांची नोंद केली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली. या प्रगणनेत सांबर 8, भेकर 4, वानर 11, तरस 2, कोल्हा 6 आणि उदमांजर 2 अशा वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. तसेच रानकोंबडा 5, पारवा 1, टिटवी 3, बुलबुल 1 आणि मोर 7 अशा पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
याशिवाय रानकोंबडी, रातवा, तितर, कोकातरी, घुबड, कोकीळ, साळुंखी आदी पक्ष्यांचे आवाजही ऐकू आले. वानर, कोल्हा, सांबर व भेकर यांचेही आवाज नोंदविण्यात आले. माळीण-सुपेवाडी पाणवठा, तेरुंगण कोटमाचा दरा, अमोंडी कळमजाई मंदिर तळे, शिनोली पाझर तलाव, साल-तळेकरवाडी तलाव आणि ढाकाळे पाणवठा या ठिकाणी ही प्रगणना करण्यात आली. मचाणावर बसून वन्यजीवनाचा जवळून अनुभव घेण्याची संधी कर्मचार्यांना मिळाली. या उपक्रमामुळे परिसरातील जैवविविधतेचा अंदाज घेण्यास मदत होत असून वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे.
“वन्यप्राणी प्रगणना ही जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे प्राण्यांची संख्या, त्यांच्या हालचाली आणि अधिवास याबाबत अचूक माहिती मिळते, जी संवर्धनासाठी उपयुक्त ठरते.”
– धनंजय कोकणे, वन्यप्राणी अभ्यासक घोडेगाव.





