Dilip Walse Patil – राज्यात सुरू असलेला मानव–बिबट संघर्षावर परिणामकारक तोडगा काढण्यासाठी राज्यातील काही लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजस्थान राज्यातील जवाई परिसराचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात स्थानिक परिस्थिती, वनव्यवस्थापन व वन्यजीव संवर्धनाचे यशस्वी मॉडेल प्रत्यक्ष पाहून त्याचा अभ्यास करण्यात आला.याबाबत माहिती देताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले. जवाई परिसरात स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन वनक्षेत्राचे व्यवस्थापन केले जाते. येथे वन्यजीवांचे अस्तित्व जपत नागरिकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जातो. मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक सहभाग, जनजागृती आणि नियोजनबद्ध उपाययोजना प्रभावी ठरत असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्रात, विशेषतः जुन्नर उपवनविभागात, करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अभ्यास दौऱ्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शरद सोनवणे, अमोल खताळ, प्रवीणसिंह परदेशी,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच डॉ.पंकज आशिया यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी विविध पैलूंवर चर्चा करून पुढील कृती आराखड्याबाबत विचारमंथन केले. जुन्नर परिसरात वाढत्या बिबट वावरामुळे निर्माण होणारा संघर्ष रोखण्यासाठी हा अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना राबवून नागरिकांचे संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “जवाई येथील अभ्यासातून स्थानिक सहभाग, नियोजन आणि वनव्यवस्थापनाचे प्रभावी मॉडेल समजले. या अनुभवाच्या आधारे जुन्नर परिसरातील मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.” – दिलीप वळसे पाटील,माजी गृहमंत्री.