Pune : मविआ’त मोठा भाऊ कोण? जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार, पाहा…

पुणे : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी पुण्यात एकत्र निवडणूक लढवण्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे एकमत आहे. मात्र आघाडीत मोठा भाऊ कोण, यावर तिढा होण्याची शक्यता आहे. फुटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा आणि काँग्रेसपेक्षा आपली ताकद अधिक असल्याचा दावा शिवसेनेचा आहे. शिवसेनेतील फुटीचा ठाकरे गटावरही परिणाम झालेला आहे.
२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे त्यावेळचा विजय राष्ट्रवादीचाच असल्याने जागा वाटपात राष्ट्रवादीच मोठा भाऊ असेल, असे पक्षाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे आघाडीत मोठा भाऊ कोण, यावरून जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९७, तर राष्ट्रवादीने ४२ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचे १०, तर काँग्रेसचे ९ उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय भूकंप झाला. शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोनच वर्षांत भाजपने याचा वचपा काढत शिवसेना फोडली आणि राज्यात नाट्यपूर्ण सत्तांतर घडवून आणले.
पुण्यात शिवसेनेला फारसा धक्का बसला नाही. माजी नगरसेवक नाना भानगिरे वगळता कोणीही शिंदे गटात गेले नाही. त्यानंतर पुढील वर्षभरातच राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. पुण्यात शरद पवारांची साथ सोडत ९० टक्के माजी नगरसेवकांनी अजित पवारांना हात दिला. परिणामी, राष्ट्रवादी पवार पक्षाकडे तीन ते चारच माजी नगरसेवक आहेत. शिवसेनेचे नऊपैकी पाच नगरसेवकही विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसला अद्यापतरी फुटीचे ग्रहण लागलेले नाही.
या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप करताना, पक्षीय बलाबलानुसार वाटप करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. मागील निवडणुकांतील जागाच कायम ठेवत, उर्वरित जागांच्या वाटपावर चर्चा व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. परिणामी, महाविकास आघाडी जागा वाटपासाठी कोणते सूत्र स्वीकारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांनी अनेकदा स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून, स्थानिक पातळीवर नेत्यांचा तोच सूर आहे. त्यामुळे आघाडी झाली, तरी जागा वाटपाच्या वादातून आघाडी तोडगा कसा काढणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.




