पुणे – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आजपासूनच (दि. २२ अॉक्टो.) सुरू होणार आहे. असे असताना देखील अद्याप कसबा विधानसभा मतदार संघाचा उमेदवार कोणत्याच पक्षाने जाहीर केला नाही. कसबा विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कॉंग्रेसकडे आहे. सध्या तेथे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे आहेत. त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे, मात्र पक्षाने अद्याप निर्णय घेतला नाही. मविआच्या एकाही जागेबाबत निर्णय झाला नाही. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसची एक “फेक’ यादी जाहीर झाली. त्यात धंगेकरांचे नाव होते. मात्र, नंतर ती “सोशल मीडिया’वरून डिलिट करण्यात आली. हाच विषय महायुतीचा देखील आहे. कसब मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे त्यांचाही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ९९ जागांचे उमेदवार जाहीर झाले. त्यात कसब्याबाबत निर्णय झाला नाही. या आधी पोटनिवडणुकीत नशीब आजमावलेले हेमंत रासने यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे, तर घाटे यांनी “ब्राह्मण कार्ड’ बाहेर काढले आहे. यामुळे कसब्यात या दोघांपैकी एकाच्या बाजूने कौल मिळतो की, तिसऱ्या कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. येत्या दोन दिवसांत सर्व पक्षांना उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे. दि. २२ पासून अर्ज दाखल करण्याला सुरूवात होणार आहे. ही मुदत २९ अॉक्टोबरला संपत आहे.