पुणे : प्राणीसंग्रहालय कधी उघडणार?

पुणे – शहरातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी नागरिकांमध्ये कायमच उत्सुकता असते. मात्र, करोनामुळे 18 महिन्यांपासून ते नागरिकांसाठी बंद आहे. ते केव्हा खुले होणार? याबाबत सातत्याने विचारणा होत आहे.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा सर्वच वयोगटातील नागरिकांचे पसंतीचे ठिकाण आहे. मोठ्या जागेवर विस्तारलेली, गर्द हिरवाईने नटलेली बाग, नेहमीच पाण्याने भरलेला तलाव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ते वाघ, सिंह, हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांपर्यंत अशा सर्वच प्रकारचे प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरू हा प्राणिसंग्रहालयात नुकताच दाखल झाला असून, नागरिकांनाही तो पहायला मिळणार आहे, अशी विचारणा होत आहे.
अशा सर्व वैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या प्राणिसंग्रहालयाला शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर शहरांमधूनही नागरिक आवर्जून भेट देतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ते नागरिकांसाठी बंद आहे. ते पुन्हा कधी खुले होणार याबाबत सातत्याने विचारणा होत आहे. काही नागरिक बागेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन प्रत्यक्ष विचारणा करत आहेत, तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारणा करत आहेत. मात्र, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून प्राणिसंग्रहालय खुले करण्याबाबत परवानगी मिळत नसल्याने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे महापालिका प्रशासनकाडून सांगण्यात येत आहे.





