Pune : व्यावसायिक कामानिमित्त बँकाँकाला निघालो होतो; तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज याचा जबाब

पुणे : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज याच्या कथित अपहरण प्रकरणात गुन्हे शाखेने त्याचा जबाब नोंदवून घेतला. ऋतुराजबरोबर असलेल्या दोन मित्रांचाही जबाब यावेळी नोंदविण्यात आला. आठवड्यापूर्वी व्यावसायिक कामासाठी दुबईला गेलो होतो. त्यानंतर लगेच खासगी विमानाने मित्रांसमवेत व्यावसायिक कामासाठी बँकाँकला निघाले होतो. मात्र, लगेच बॅंकॉकला जाण्यास कुटुंबिय परवानगी देणार नाहीत, असे लक्षात आल्यामुळे या दौऱ्याबाबत कुटुंबियांना सांगितले नसल्याचा जबाब ऋतुराजने पोलिसांना दिला.
ऋषीराज याचे सोमवारी (दि.१०) सायंकाळी अपहरण झाल्याच्या बातमीने राज्यभरात खळबळ उडाली होती. आयुक्तालयात आलेल्या दूरध्वनीनंतर पोलिसांनी सिंहगड पोलिसठाण्यात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. काही वेळातच हे प्रकरण अपहरणाचे नाही असे लक्षात आले. मात्र तो पर्यंत ऋषिराज कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता परदेशात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर तानाजी सावंत यांनी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांना याबाबतची माहिती दिली.
त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर बँकाँकला निघालेले विमान पुण्याकडे वळविण्याची विनंती केली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ऋषीराज आणि त्याचे मित्र लोहगाव विमानतळावर उतरले.
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, चौकशीत हे अपहरण नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संबंधित गुन्हा रद्दबातल करण्याची प्रक्रिया (समरी रिपोर्ट) पार पाडली जाऊ शकते. याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल झालेला कथित अपहरण प्रकरणाचा गुन्हा रद्दबातल केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.




