Hunger Strike : आश्वासने नको, पाणी द्या! खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी कळसमध्ये आमरण उपोषण
Hunger Strike : सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांचे कळस तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण; पाझर तलाव आणि बंधारे भरून देण्याची मागणी.

Hunger Strike – खडकवासला कालव्याचे पाणी तातडीने इंदापूर तालुक्यासाठी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांनी कळस (ता. इंदापूर) येथील तलाठी कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि. 2) बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसराचे लक्ष वेधले गेले आहे.
तरंगवाडी, अकोले, न्हावी, रुई, शेटफळगढे, कौठळी आणि निरगुडे या गावांतील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांच्या विहिरीलगत असलेले पाझर तलाव आणि बंधारे भरून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वारंवार आंदोलने, निवेदने आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही खडकवासला कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्यासाठी सोडण्यात आले नसल्याने हा कठोर निर्णय घेतल्याचे खारतोडे यांनी सांगितले.
तसेच 12 मे रोजी इंदापूर तालुक्यासाठी सुरू करण्यात आलेले उन्हाळी आवर्तन मध्येच बंद करणार्या जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. कालव्याचे आवर्तन वेळेवर न मिळाल्याने शेतीपिके करपली असून विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
परिणामी शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. भगवान खारतोडे यांनी यापूर्वीही अनेक वेळा धरणे आंदोलन, निवेदने आणि विविध माध्यमांतून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. उपोषणस्थळी बोलताना खारतोडे म्हणाले, खडकवासला कालव्याच्या पाण्याअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेती, जनावरे आणि नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कालव्याचे पाणी सोडावे. या आमरण उपोषणाला परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी भेट देऊन गेले असले तरी कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे खारतोडे यांनी स्पष्ट केले. खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.






