Pimpari News : नेहरूनगर, पिंपरी येथील संतोषी माता चौकात असलेल्या शिवम ज्वेलर्स या सराफी दुकानातून चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने मालकाची नजर चुकवून तब्बल ३३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या ३९ सोन्याच्या चैनी चोरून नेल्या आहेत. या घटनेमुळे सराफा बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी सहाळी पावणे वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी बच्चु आशिष गांगुली (वय ३६, रा. फ्लॅट नं. ०८, भोसले आर्केड, नेहरू नगर, पिंपरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी शिवम ज्वेलर्सचे मालक उमेश छगनलाल जैन (वय ५३, रा. शंखेश्वर दर्शन बिल्डिंग, नेहरूनगर, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी पिंपरी पालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी सकाळी ९.४० ते ९.४५ वाजेच्या सुमारास संतोषी माता चौकातील ‘शिवम ज्वेलर्स’ येथे झाली. दुकानात कामाला असलेल्या आरोपी बच्चु गांगुली याने चोरीच्या उद्देशाने दुकानात ठेवलेल्या २२ कॅरेटच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वजनाच्या एकूण ३९ नग सोन्याच्या चैनी (एकूण वजन २२५.८०० ग्रॅम) लंपास केल्या. या सोन्याच्या चैनींची बाजारातील किंमत ३३ लाख ९० हजार रुपये आहे. मालकाची नजर चुकवून आरोपीने हा ऐवज चोरून नेला.